भाषा हे विचारांचे आदान प्रदान करण्याचे एक सशक्त माध्यम आहे. आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग! आपली मातृभाषा वा प्रादेशिक भाषांव्यतिरिक्त इतर भाषांबद्दल माणसाला नेहमीच कुतुहल राहिले आहे. दुसऱ्या भाषेतील एखादी कलाकृती विविध कारणांसाठी आपल्या भाषेत भाषांतरित करण्याची उत्तम कामगिरी फार पुर्वीपासून केली गेली आहे. परकीय भाषांमधून विविध स्वरूपाची भाषांतरांची संख्या वाढत गेली व आज केवळ परकीय भाषांमधूनच नाही तर प्रादेशिक भाषांत भाषांतराची मागणी ही वाढली आहे. वाढत्या मागणीला पूर्ण करणारे उत्तम सुजाण भाषांतरकार ही काळाची गरज बनली आहे.
केवळ एका भाषेतल्या शब्दाला दुसऱ्या भाषेत प्रतिशब्द शोधून वापरणे इतकेच मर्यादित स्वरूप भाषांतराचे असते काय? भाषांतर म्हणजे नेमके काय - एका भाषेतला मजकूर त्याच्या संदर्भांसकट नीट समजावून घेऊन तो दुसऱ्या भाषेच्या शैलीत शोभेल अशा पध्दतीने अर्थ न बदलता व्यक्त करणे! भाषांतर करताना नेमकी कोणती व कशी काळजी घ्यावी जेणेकरून भाषांतर फलदायक ठरेल?
ह्या व अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे व काळाची गरज ओळखून सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी Language Services Bureau तर्फे दोन महिन्यांचा भाषांतरामधला Intermediate Course हा अभ्यासक्रम रचला गेला आहे. अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या तज्ञ मंडळींकडून भाषांतराविषयी अतिशय महत्त्वाच्या व उपयूक्त सूचना या अभ्यासक्रमा दरम्यान दिल्या जातात.
भाषांतरकाराचा दृष्टीकोन, ज्ञान, हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे, ते आजच्या काळातील तंत्रज्ञानाची जाण असणे. इतर क्षेत्रांप्रमाणेच भाषांतरातही तंत्रज्ञानाचे महत्त्व आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांमध्ये CAT tools म्हणजेच – Computer Aided Translation tools ची ओळख ही करून दिली जाते. म्हणजेच- जेव्हा एक-दोन नाही तर शेकडो हजारो पानांचा मजकूर भाषांतरित करावा लागतो, तेव्हा संगणकाच्या मदतीने हे काम लवकर पूर्ण होण्यास मदत होते. ह्या CAT tools च्या सहाय्याने भाषांतरकाराला त्याच्या कामाच्या दर्जाकडे अजून बारकाईने लक्ष देणे शक्य होते. मोठे मोठे भाषांतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी CAT tools हे एक वरदानच ठरले आहे!
आज घडीला भाषांतराचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. उदा. तांत्रिक, व्यावसायिक, वैद्यकीय, शास्त्रीय, विधिविषयक, साहित्यिक, जाहिरात क्षेत्र इ. एक ठराविक भाषांतर प्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा व त्या विषयाचा सखोल अभ्यास कसा करावा हे इथे उत्तमरित्या उलघडून सांगितले जाते. उदा. तांत्रिक, वैज्ञानिक लिखाणाचे भाषांतर करताना ठराविक व योग्य ते शब्दच वापरावे लागतात. त्यांना पर्यायी शब्द नसतात. विधिविषयक अथवा वैद्यकीय कागदपत्रे ही थेट एखादयाच्या आयुष्याशी निगडीत असल्यामुळे एका शब्दाचीही चूक स्वीकारली जाऊ शकत नाही. पण तेच् एखाद्या कथा-कादंबरीचे भाषांतर करताना शब्द अथवा शब्दसमूह निवडण्याचे स्वातंत्र्य घेता येऊ शकते. असे हे भाषांतराचे वैविध्यपूर्ण पण तितकेच जबाबदारीचे कार्य पूर्ण करताना कुठे गफलत झाली तर ते थेट हास्यास्पद, संदर्भहीन किंवा अगदी निरूपयोगीही ठरू शकते. असे होऊ नये ह्या साठी दर आठवडयात या अभ्यासक्रमात एक स्वतंत्र प्रकार घेऊन त्यावर लक्ष केंद्रीत केले जाते. प्रत्येक प्रकाराशी संबंधित स्वतंत्र व प्रतिनिधिक लेख वा मजकूर विद्यार्थ्यांकडून भाषांतरित करून घेतले जातात व शक्य तितक्या खोलात जाऊन त्याचे योग्य परिक्षण तज्ञाकर्वे केले जाते.
ह्या सर्व ज्ञानदानापलीकडे होतकरू भाषांतरकाराने त्याच्या व्यावहारिक आयुष्यात कोणती काळजी घेणे अपेक्षित आहे हे विषयांच्या ओघात सूचित केले जाते. एखादे भाषांतर कार्य हाती घेण्या आगोदर व हाती घेतल्यानंतर कोणती माहिती ग्राहकाकडून घेतली जावी जेणेकरून प्रत्यक्ष भाषांतराचे कार्य सुरळीत पार पडेल, हे समजावताना तज्ञमंडळींना आलेले बरे-वाईट अनुभव सांगितले जातात. कोणत्या कामाला किती काळ लागू शकतो ह्याचा अंदाज, बांधून दिलेली वेळ पाळणे किती महत्त्वाचे आहे, या व अशा इतर अनेक व्यावहारिक गोष्टींकडे ही या अभ्यासक्रमाद्वारे लक्ष वेधले जाते. इतर कोणत्या स्वरूपाची आव्हाने समोर येऊ शकतात, व ती पार पाडण्यासाठी कोणती पावले उचलावी, ह्या सर्वांची समाधानकारक टिप्पणी सुद्धा दिली जाते.
ह्याच अनुषंगाने होतकरू भाषांतरकाराला प्रत्यक्ष कामाची एक झलक देण्याकरिता या अभ्यासक्रमच्या सांगते नंतर दोन महिन्यांची इंटर्नशिप आखली गेली आहे. या काळात विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर भाषांतर करण्याची संधी दिली जाते. इतकेच नाही तर केलेले भाषांतर तज्ञांकडून तपासून व सुधारून दिले जाते. सहाजिकच या मुळे भाषांतराची गुणवत्ता उंचावण्यास व भाषांतरकाराचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते!
तर असा हा भाषांतराचा सुंदर प्रवास समजून घेताना असे लक्षात येते, की दोन्ही भाषांवर उत्तम प्रभुत्त्व, जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती व त्या जोडीला या अभ्यासक्रमातील अचूक मार्गदर्शन असेल तर एक प्रतिभावान भाषांतरकार उदयास यायला फार अवकाश लागणार नाही!
Varadainee Joshi, Mumbai
Course participant, 2020
For any queries related to language translation services. Inquire at our email address below or give us a call today!
info@languageservicesbureau.com
Telephone: +91-20-24470509, +91-82370 60559
Similar articles for you...
आमच्या गेल्या महिन्यातील ब्लॉग मध्ये भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करियर क्षेत्रांची माहिती आपल्याला मिळाली. जिथे भाषेचे ज्ञान फायद्याचे ठरते असे इतर व्यवसाय आपण या महिन्यात पाहुयात.
Posted by : Language Services Bureau
तुम्ही कोणत्या ही क्षेत्रात काम करीत असलात तरी विविध भाषांचे ज्ञान अवगत असणे, हे एक महत्वाचे कौशल्य आहे. जागतिकी करण, आंतरराष्ट्रीय व्यापार उद्दमा मध्ये झपाट्याने झालेली वाढ, इंटरनेट व त्याची व्याप्ती यांमुळे नोकरीसाठी उमेदवारांची निवड करताना उमेदवाराला एखादी परकीय भाषा अवगत असेल तर त्याला निश्चितच प्राधान्य मिळते.